मोदींचा चाणक्य ठरवणार शिवसेनेची रणनीति ?

prashant-kishor
मुंबई – 2014च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणा-या प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अद्याप या भेटीमागील कारण स्पष्ट झाले नाही. पण शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये विजयी करण्याची रणनीति प्रशांत किशोर ठरविणार, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. सध्या प्रशांत किशोर जेडीयूचे उपाध्यक्ष आहेत.

शिवसेनेच्या खासदार-आमदारांची बैठक मातोश्रीवर पार पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, अनंत गीते, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई यांच्यासह इतरही खासदार या बैठकीला उपस्थित होते. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोरही या बैठकीला उपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण देत, प्रशांत यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्याचे म्हटले. घटक पक्षाचे नेते असल्यामुळे प्रशांत किशोर आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राऊत पुढे बोलताना म्हणाले, सध्या प्रचाराची समीकरणे उद्धव ठाकरे जुळवित आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि युतीबाबत शिवसेनेला बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, असे सांगत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कामाला लागते आणि सेना स्वतःच्या ताकदीने लढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment