दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर रिलायन्स कम्युनिकेशन्स

reliance
अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन्स देशातील सर्वात स्वस्त मोबाइल सेवा देणारी कंपनी आता दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल अंबानी यांची प्रसिद्ध रिलायंस कम्युनिकेशन्स कंपनी मोठ्या आर्थिक गर्तेत सापडली आहे. सोमवारी कंपनीचे शेअर 54.3 टक्क्यांने घसरून 5.30 रुपये इतका झाला आहे.

आरकॉमने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे कंपनी दिवाळखोरीत असल्याबाबत अर्ज केला आहे. आपल्या मालकीची संपत्ती विकूनही कर्जदारांचे कर्ज चुकते करण्यास कंपनी असमर्थ असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आरकॉमने एनसीएलटीकडे अर्ज केल्यानंतर अंबानी समूहातील इतर कंपन्यांवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

व्यापारी जगतात अनिल अंबानी आणि रिलायन्स यशाच्या शिखरावर होते. मोठा भाऊ मुकेश अंबानी यांच्या वाटपानंतर अनिलच्या वाटेला आरकॉम आली आणि सीडीएमए तंत्रज्ञानाच्या आधारावर कंपनीने 500 रुपयांमध्ये मोबाइल सेवा देण्यास सुरुवात केली. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्यानंतर आता कंपनीची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे.

विविध कर्जदारांच्या कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास कंपनीने एनसीएलटीमध्ये दिवाळखोरी आणि कर्ज घेण्याची अक्षमता कायदा (आयबीसी) अंतर्गत जलद ट्रॅक रेझोल्यूशनचा प्रस्ताव मांडला आहे. कंपनीने म्हटले आहे की, ‘संचालक मंडळाने कर्ज योजनेचे पुनरावलोकन केले आहे मात्र 18 महिन्यांनंतरही मालमत्ता विक्री करण्याची योजना यशस्वी झाली नाही. अशा परिस्थितीत, आयबीसी अंतर्गत प्रक्रिया सुरू करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग राहिला नाही.’

कंपनीला कर्जाची परतफेड लवकर करायची आहे. आयबीसीच्या अंतर्गत आल्यानंतर 270 दिवसांच्या आत कर्जाची परतफेड होऊ शकते.

Leave a Comment