आता महिलाही करू शकतील खाणींमध्ये काम

women
केंद्रीय श्रम मंत्रालयाने खाणींमध्ये काम करण्याची महिलांना परवानगी देण्यासाठी नियम अधिसूचित केले. यामुळे महिलाही खाणींमध्ये काम करू शकतील आणि त्यांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध होऊ शकतील.

खाण कायदा 1952 च्या कलम 83 (1) अंतर्गत केंद्र सरकारने महिलांना जमिनीवरील आणि जमिनीखालील खाणींमध्ये काही अटींवर काम करण्याची परवानगी दिली आहे. “खाणीचा मालक महिलांना संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कामावर ठेऊ शकतो, महिलांची नियुक्ती त्यांच्या लेखी परवानगीनंतरच केली जाईल, अशा प्रकारे नियुक्ती करण्यात आलेल्या महिलांना पुरेशा सुविधा आणि संरक्षण व आरोग्य सुविधा पुरवल्या जाव्यात, किमान 3 महिलांना एका पाळीत (शिफ्ट) नियुक्त केले जाईल,” अशा काही अटी जमिनीवरील खाणीत काम करणाऱ्या महिलांना रोजगार देण्याबाबत ठेवण्यात आल्या आहेत.

जमिनीखालील खाणीत काम करणाऱ्या महिलांना रोजगार देण्याबाबतही काही अटी घालण्यात आल्या आहेत. खाण मालक महिलांना सकाळी 6 ते संध्याकाळी 7 दरम्यान जिथे सतत उपस्थित राहण्याची आवश्यकता नसेल अशा ठिकाणी तांत्रिक, निरीक्षण आणि व्यवस्थापन काम देऊ शकतो, अशा प्रकारे नियुक्ती करण्यात आलेल्या महिलांना पुरेशा सुविधा आणि संरक्षण व आरोग्यसोई पुरवल्या जाव्यात, किमान 3 महिलांना एका पाळीत (शिफ्ट) नियुक्त केले जाईल इत्यादी अटींचा त्यात समावेश आहे.

यापूर्वी खाणीत महिलांना संध्याकाळनंतर काम करायला बंदी होती. विविध महिला कामगार गट, उद्योग जगत आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खाणीत महिलांना रोजगाराच्या संधी देण्याची मागणी केली होती. विविध मंत्रालयांशी सल्ला मसलत करून श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ही परवानगी दिली आहे, असे मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Comment