या आफ्रिकी देशाचे कर्ज चीनकडून माफ…पण गुपचूप

china
कॅमेरून या आफ्रिकी देशाचे कर्ज चीनने माफ केले आहे. मात्र याची वाच्यता कुठेही करण्यात आली नव्हती. एका चिनी वाहिनीने चुकीचे वृत्त दिल्यानंतर अखेर सरकारने या कर्जमाफीची कबुली दिली.

चीनचे ज्येष्ठ राजनयिक यांग जिएची यांनी कॅमेरूनचे अध्यक्ष पॉल बिया यांची गेल्या महिन्यात भेट घेतली होती. त्यावेळी ही कर्जमाफी गुपचूप उरकरण्यात आली. चीन सरकारने त्याची अधिकृत घोषणा केली नाही आणि कॅमेरूननेही ते जाहीर केले नाही.

अखेर एका चिनी वृत्तवाहिनीने चीनने कॅमेरूनचे 5.2 अब्ज डॉलरचे कर्ज माफ केल्याची बातमी दिली. अर्थात हे वृत्त चुकीचे होते आणि प्रत्यक्षात चीनने 78.4 दशलक्ष डॉलरचे कर्ज माफ केल्याचे वॉलस्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राने म्हटले आहे. वास्तविक कॅमेरूनने 2000 सालापासून चीनकडून घेतलेल्या कर्जाची रक्कमच 5 अब्ज डॉलर एवढी आहे.

कॅमेरूनवर 10 अब्ज डॉलरचे कर्ज असून त्यातील एक तृतीयांश कर्ज चीनने दिलेले आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
गेल्या दोन दशकांत चीनने अनेकदा कॅमेरूनचे कर्ज माफ केले आहे. यापूर्वी त्याने 2001 मध्ये 34 दशलक्ष डॉलरची कर्जमाफी केली होती, तर 2007 मध्ये 32 दशलक्ष आणि 2010 मध्ये 30 दशलक्ष डॉलरचे कर्ज माफ केले होते.

Leave a Comment