राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमवा किंवा दंड भरा- मंत्र्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल

Arif-Akeel
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेसाठी गर्दी जमवा अन्यथा प्रत्येक नेत्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल, अशी धमकी देणारे वक्तव्य मध्यप्रदेशच्या एका मंत्र्याने केले आहे. या मंत्र्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

मध्य प्रदेशचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अरिफ अकील यांची ही क्लिप आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये ते सिहोर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना दम भरताना दिसतात. रविवारी अकील यांनी जिल्हा पातळीवरील नेत्यांची एक सभा घेतली त्यात त्यांनी वरील वक्तव्य केले. जिल्ह्याच्या विविध भागातून कार्यकर्त्यांना आणणाऱ्या वाहनांचे आपण चित्रीकरण करणार असून राज्यातील नेत्यांनी बोलावलेली वाहने रिकामी असतील तर त्यांना प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड लावू, असे ते या चित्रफितीत म्हणताना दिसतात.

सोमवारी ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर नामुष्कीची वेळ आली. दुसरीकडे विरोधी भारतीय जनता पक्षाने या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. राहुल गांधींपुढे गर्दी जमवून त्यांची मर्जी राखण्याची काँग्रेसमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे, असे भाजपने म्हटले आहे.

राहुल गांधी हे येत्या 8 फेब्रुवारी रोजी भोपाळ येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. कॉंग्रेसला निवडून दिल्याबद्दल ते शेतकऱ्यांचे आभार मानणार आहेत.

Leave a Comment