कुंभमेळ्यात इंजिनिअर ते एमबीए झालेले 10 हजार पदवीधारक बनले नागासाधू

naga-sadhu
प्रयागराज – सध्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेला कुंभमेळा आता अंतिम टप्प्यात पोहचला असून कुंभमेळ्याच्या या अंतिम टप्प्यात नागा साधू होण्याची तब्बल 10 हजार जणांनी दीक्षा घेतली आहे. ही दीक्षा घेणा-यांमध्ये इंजिनिअर ते एमबीए पदवीधारकांचा समावेश आहे. सनातन धर्मांमध्ये नागा साधू बनणे तपस्यातील सर्वात कठीण विधींपैकी एक आहे. तरीही नागा साधू बनण्याची दीक्षा अनेक पदवीधरांनी घेतली आहे.

29 वर्षीय शंभू गिरी प्रयागराजमध्ये नागा साधूची दिक्षा घेण्याच्या वाटेवर निघाला आहे. युक्रेनमधून त्याने मॅनेजमेंटमधून पदवी घेतली आहे. उज्जैनमधील बारावीचा टॉपर असलेल्या घनश्याम गिरीचीही ही कथा आहे. या सर्वांनी मोह-माया टाळून नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. तर मरीन इंजिनिअर असलेल्या 27 वर्षीय रजत कुमारनेही मरिन लाईनमध्ये मिळणारे मोठ्या पगाराचे पॅकेज सोडून चक्क नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. या तीन पदवीधारकांप्रमाणेच तब्बल 10 हजार जणांनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. त्यासाठी केस अर्पण हा विधीही त्यांनी पूर्ण केला. रात्रभर जागून ओम नम: शिवायचा जपही या तरुणांनी केला आहे.

कठीण परिश्रम नागा साधू बनण्यासाठी घ्यावे लागतात. तब्बल सहा वर्षानंतर नागा साधू बनता येते. तर फक्त लंगोटशिवाय कोणतेही वस्त्र नवीन सदस्याला परिधान करण्यास मनाई आहे. कुंभ मेळ्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर नागा साधूमधील नवे सदस्य त्यांचे लंगोट त्याग करु शकतात. दिवसातून नागा साधू फक्त एकवेळ जेवण करु शकतात. त्याचप्रमाणे त्यांना सात घरे फिरुन भिक्षा मागावी लागते. जर भिक्षा न मिळाल्यास त्यांना उपाशी राहावे लागते. फक्त जमिनीवर झोपून नागा साधूंना त्यांचे संपूर्ण आयुष्य पार पाडायचे असते.

Leave a Comment