ममतांच्या जनविरोधी सरकारचे बंगालमधील कमी दिवस उरले आहेत

yogi-aadityanath
कोलकाता – तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली असून बंगालमधील ममतांच्या जनविरोधी सरकारचे कमी दिवस उरले असल्याचे योगींनी म्हटले आहे. योगींच्या रॅलीला पश्चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारल्यानंतर योगी यांनी हे वक्तव्य केले आहे.

बालूरघाट येथील गणतंत्र बचाव रॅलीला योगी संबोधित करणार होते. पण सभास्थळाजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. यामुळे ते रॅलीत सहभागी होऊ शकले नाहीत. योगींनी यानंतर ऑडिओ लिंकच्या माध्यमातून रॅलीला संबोधित केले. मला तिथे येण्याची आणि तुम्हाला भेटण्याची परवानगी तृणमूल सरकारने न दिल्यामुळे तुमच्यासोबत बोलण्यासाठी मला मोदीजींच्या डिजिटल इंडियाची मदत घ्यावी लागत आहे. तृणमूल सरकार जनविरोधी, लोकशाही विरोधी आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेसोबत यांनी छेडछाड केली असल्याची टीका योगी यांनी केली आहे.

भाजपला तृणमूल सरकार घाबरत असून भाजपचे सरकार बंगालमध्ये आणण्यासाठी कठीण प्रयत्न करा, असा सल्लाही योगींनी बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. ममता बॅनर्जी सरकार संस्थांचा राजकीय फायद्यांसाठी दुरुपयोग करत आहे, असेही योगी म्हणाले.

Leave a Comment