बंगळुरु ऐवजी विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना

combo
मुंबई – या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार असून सुरक्षेच्या कारणास्तव एकदिवसीय सामन्यांच्या वेळापत्रकात आणि सामन्यांच्या ठिकाणात काही दिवसांपूर्वीच बदल करण्यात आला होता. त्यानंतर आता टी-20 सामन्यांच्या ठिकाणातही बदल करण्यात आला आहे.

२४ फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे ऑस्ट्रेलिया संघ आपल्या भारत दौऱ्याला सुरुवात करणार आहे. बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियम येथे २४ फेब्रुवारीचा हा सामना आधी खेळवण्यात येणार होता. आता सुरक्षेचे कारण कर्नाटक सरकारने दिल्यामुळे विशाखापट्टणम येथे पहिला टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. तर, २७ फेब्रुवारीला विशाखापट्टणम येथे होणारा दुसरा टी-20 सामना बंगळुरू येथे होणार आहे.

२४ फेब्रुवारी कर्नाटक येथे ‘एअरो इंडिया’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कर्नाटक सरकारने या कार्यक्रमामुळे सुरक्षा पुरण्याबाबत असमर्थता दर्शवत तारिख बदलण्याची विनंती बीसीसीआयकडे केली होती. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीतील सदस्य विनोद राय आणि डायना एडुल्जी यांनी याला मंजुरी दिली आहे.

ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यात २ टी-ट्वेन्टी आणि ५ एकदिवसीय सामने खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना हैदराबाद येथे २ मार्च, दुसरा नागपूर ५ मार्च, तिसरा रांची ८ मार्च, चौथा मोहाली १० मार्च आणि पाचवा सामना दिल्ली येथे १३ मार्चला होणार आहे.

Leave a Comment