या निर्दयी सरकारसाठी तुम्ही आपल्या जीवाची बाजी लावू नका – राज ठाकरे

anna-hazare
अहमदनगर- राळेगणसिद्धी येथे उपोषण आंदोलन करत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भेट घेतली. राज ठाकरे यांनी या भेटीनंतर ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि माध्यमांशी संवाद साधताना सध्याचे मोदी सरकार नालायक-निर्दयी असून आपण अद्याप मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान पाहिला नसल्याचा घणाघात केला. या निर्दयी सरकारसाठी अण्णा तुम्ही आपल्या जीवाची बाजी लावू नका असे सांगत त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.

सकाळी ११ वाजता राज ठाकरे राळेगणसिद्धी मध्ये दाखल झाले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शिरीष पारकर आदी मनसे नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते. अण्णांची भेट आणि बंद खोलीत चर्चेनंतर त्यांनी प्रथम ग्रामस्थांशी आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

राज म्हणाले, नरेंद्र मोदींनी ट्विट करत २०१३साली लोकपाल-लोकयुक्ताची मागणी केली होती. भारतीय जनता पक्ष त्यावेळी सुरू असलेल्या आंदोलनाचा फायदा घेत सत्तेवर आला. पण आता पाच वर्षे उलटल्यानंतरही आणि निवडणुका जवळ येत असतानाही या सरकारला आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेला असल्याची टीका त्यांनी केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या केजरीवालांची जनतेला ओळखही नव्हती. ते केजरीवाल अण्णांच्या आंदोलनाचा फायदा घेत ते आज दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. मात्र, आज आश्चर्याची गोष्ट म्हणजे अण्णांच्या उपोषणाचा सहावा दिवस असताना केजरीवाल यांनी अण्णांची आणि आंदोलनाची साधी चौकशीही केली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी २०१९ सर्वच पक्ष एकत्र येत आहेत का, या प्रश्नावर बोलताना सांगितले की, मोदी-शहा विरुद्ध भारतीय जनता अशी २०१९ निवडणूक असेल, त्यात काहीजण भारतीय जनता पक्षातील सुद्धा असू शकतील, असेही त्यांनी मिश्किल स्वरात सांगितले. एखाद्या गडाचा गडकरी सुद्धा महत्वाचा ठरतो अशी कोटीही राज यांनी या संदर्भात केली.

Leave a Comment