नायजेरियात ‘बोको हराम’चा रक्तपात, ६० ठार

boko-haram
रण – नायजेरियातील ईशान्येकडील रण शहरात ‘बोको हराम’ च्या दहशतवाद्यांनी आणखी एक हल्ला केला असून या हल्ल्यात ६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या हल्ल्याचा अॅम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाचे संचालक ओसाई ओझिगो यांनी निषेध केला आहे.

ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींने सांगितले की या हल्ल्याच्या एक दिवस आधीच येथील नायजेरियन सैनिक आपली जागा सोडून पळून गेले होते. येथील नागरिकांचे संरक्षण करण्यात ते सर्वजण अपयशी ठरल्याची माहिती वरिष्ठांना देण्यासाठी तेथून निघून गेले होते, असेही ओझिगो यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी दोन आठवड्यांपूर्वीच येथील सैनिकांना पळवून लावले होते. बोको हरामचा हा एक मोठा हल्ला आहे.

हे शहर दहशतवाद्यांनी ताब्यात घेतल्यानंतर हा हल्ला दोन आठवड्यांत करण्यात आला. त्यांनी गार्शिगर समाज आणि बोर्नो येथील मोबार स्थानिक सरकारचा परिसरावर मोठे हल्ले चढवले आहेत. बोको हराम हा पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील इस्लामिक दहशतवादी गट आहे. त्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघाशी युती केली आहे. हा गट पाश्चिमात्य शहरीकरण, शिक्षणाच्या विरोधात आहे. नायजेरियामध्ये शरिया कायदा आणणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

Leave a Comment