बिना दुकानदार,विक्रेत्याचे दुकान चाललेय जोमात

shop
दुकान सताड उघडे आहे, मालही भरपूर आहे, दुकानात दुकानदार नाही, विक्रेता नाही इतकेच काय बाहेर गुराखाही नाही तर त्या दुकानाचे काय होईल हे वेगळे सांगायला नको. पण भारतात केरळ राज्यातील कुन्नूर येथे असे एक आगळेवेगळे दुकान सुरु आहे आणि ते जोमाने चालले आहे. विशेष म्हणजे हे दुकान काही उदात्त हेतूने चालविले जात आहे.

१ जानेवारी पासून हे दुकान सुरु झाले असून ते दिव्यांग लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या जनशक्ती ट्रस्ट या सेवाभावी संस्थेकडून चालविले जाते. या दुकानात दिव्यांग लोकांनी बनविलेल्या रोजच्या गरजेच्या वस्तू विक्रीसाठी आहेत. दुकानाबाहेर एक पाटी आहे. त्यावर लिहिले आहे. या दुकानात दुकानदार नाही, विक्रेता नाही, तुम्हाला जे हवे ते खरेदी करा आणि त्या वस्तूवर लिहिलेली किंमत शेजारील बॉक्स मध्ये टाका. या दुकानाच्या आसपास असलेले भाजीवाले या ट्रस्टला मदत म्हणून सकाळी ६ वा. दुकान उघडतात, रात्री १० वा. बंद करतात. दुकानात नाही म्हणायला एक सीसीटीव्ही लावला आहे. पण महिन्यातला अनुभव असा कि ग्राहक खरेदी केल्यावर योग्य पैसे पेटीत टाकत आहेत.

जनशक्तीचे संस्थापक सुगुनन म्हणाले आमच्या या दुकानाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या धर्तीवर आणखी काही दुकाने सुरु करण्याचा विचार करत आहोत.

Leave a Comment