चेन्नई विमानतळावर प्रवाशाकडून बिबट्याचे पिल्लू जप्त

chennai
थायलंडहून आलेल्या एका प्रवाशाकडून सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी चक्क एक बिबट्याचे पिल्लू जप्त केले. काहा मोईदीन असे या प्रवाशाचे नाव असून तो 45 वर्षांचा आहे. मोईदीन याने चेक इन केलेल्या सामानात हे पिल्लू दडवून ठेवले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सामान्य तपासणीसाठी या प्रवाशाला थांबविले तेव्हा हे पिल्लू आढळून आले. या प्रवाशाची अंगझडती घेताना त्याच्या चेक इन केलेल्या सामानातून गुरगुरण्याचा हलकासा आवाज आला. अधिक तपासणी केल्यावर प्लॅस्टिकच्या एका गुलाबी बास्केटमध्ये हे पिल्लू ठेवलेले आढळून आले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

हे पिल्लू धक्का बसलेल्या स्थितीत होते आणि मोठ्याने आवाज करत होते. त्याला सीमाशुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी बाटलीतून दूध दिले.

यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. हे पिल्लू पॅन्थेरा पॅरडूस प्रजातीची मादा बिबट्या असल्याची वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. हे पिलू 1.1 किलो वजनाचे असून त्याची लांबी 54 सेमी आहे.

हे पिलू आणि संबंधित व्यक्ती या दोघांनाही तमिळनाडूच्या वन खात्याकडे सोपविण्यात आले. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत आरोपीविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment