गुजरातमधील काँग्रेस आमदाराचा पक्षातील कुरबुरीला कंटाळून राजीनामा

asha-patel
गुजरातमधील काँग्रेसच्या एका महिला आमदाराने पक्ष आणि विधानसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षामधील अंतर्गत भांडणाला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे या आमदाराने म्हटले आहे.

आशा पटेल असे या महिला आमदाराचे नाव असून त्या मेहसाणा जिल्ह्यातील उंझा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी आपला राजीनामा गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे शनिवारी सकाळी पाठविला. अध्यक्ष त्रिवेदी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

पटेल यांचा राजीनामा हा काँग्रेसच्या दृष्टीने धक्का मानला जात आहे कारण त्यांनी ही जागा 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपकडून हिसकावली होती. उंझा हा मेहसाणा लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे आणि सध्या मेहसाणाची जागा भाजपकडे आहे. या सात जागांपैकी चार भाजपकडे तर तीन काँग्रेसकडे आहेत.

पटेल यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. “पक्षातील सततच्या दुफळीमुळे तसेच नेतृत्वाकडून माझ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. गुजरात काँग्रेसमधील परिस्थिती संबंधात आपल्या निवेदनांकडे गेल्या एक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी मतदारसंघातील लोकांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेईल, असे सत्तारुढ भाजपामध्ये प्रवेश करणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना पटेल म्हणाल्या.

दरम्यान, पटेल यांनी वैयक्तिक लाभासाठी हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया राज्य काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांनी दिली.

Leave a Comment