‘दिवाळखोर’ पाकिस्तानला चीन देणार 2.5 अब्ज डॉलर

combo
आपल्या जीवलग मित्राची विदेशी चलनाची स्थिती सुधारण्यासाठी चीन पुढे आला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी चीन त्या देशाला 2.5 अब्ज डॉलरचे कर्ज देणार आहे, असे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे.

पाकिस्तानची गंगाजळी जवळपास आटली असून परदेशी कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान जवळजवळ दिवाळखोर झाला आहे. पाकिस्तानकडे सध्या केवळ 8.12 अब्ज डॉलरचा परकीय चलनाचा साठा असून त्यातून केवळ 7 आठवडे आयातीचे पैसे देता येऊ शकतील. आंतरराष्ट्रीय चलन निधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेने (डब्ल्यूबी) निर्धारित केलेल्या किमान पातळीपेक्षा हा चलनसाठा कमी आहे. डब्ल्यूबी आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने पाकिस्तानला कर्ज देण्यास नकार दिला आहे.

“चीन पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेत 2.5 अब्ज डॉलरची ठेव ठेवणार आहे,” असे अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द एक्स्प्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राला सांगितले. या 2.5 अब्ज अमेरिकी डॉलरच्या ठेवींमुळे या आर्थिक वर्षात चीनचे योगदान 4.5 अब्ज अमेरिकी डॉलरवर जाईल, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

पाकिस्तानला पश्चिम आशियातील दोन देशांनी 4 अब्ज डॉलरचे कर्ज दिले आहे. तरीही दोन महिन्यांच्या आयातींचे पैसे देणेही पाकिस्तानला अवघड होत आहे.

सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीने कर्ज मिळण्यासाठी चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरातला भेट दिली होती.

Leave a Comment