अमेरिकेपाठोपाठ रशियाही अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर

russia
अमेरिका आणि रशियादरम्यान शीतयुद्धाच्या काळात झालेल्या अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर पडण्याची घोषणा रशियाने केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी शुक्रवारी या करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. त्याला उत्तर म्हणून रशियाने हे पाऊल उचलले आहे.

मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे कमी करण्यासाठी अमेरिकी आणि सोव्हिएत युनियन यांच्यात 1980 च्या दशकात इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी (आयएनएफ) हा करार झाला होता. त्यातून बाहेर पडण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून रशियासुद्धा आयएनएफमधून बाहेर पडत आहे, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी जाहीर केले.

अमेरिकेने यापूर्वीच आयएनएफ कराराचा भंग केला आहे, असे पुतिन म्हणाले. या प्रश्नी वाटाघाटींसाठी रशिया अजूनही तयार आहे, मात्र त्यांनी या प्रकरणी चर्चा सुरू करू नये, असे पुतिन यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांना सांगितले आहे असे रशियाच्या सरकारी स्पुटनिक न्यूज संकेतस्थळाने म्हटले आहे.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि सोव्हिएत नेते मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी यांच्यात आयएनएफ करार झाला होता. त्या अंतर्गत 2700 लघु आणि मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली होती. या दोन महाशक्तींमधील तणाव कमी करण्यासाठी या कराराची मदत झाली होती.

Leave a Comment