रशियासोबतच्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून अमेरिकेची एकतर्फी माघार

america
अमेरिका व रशियाच्या यांच्यात शीतयुद्धाच्या काळात करण्यात आलेल्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा अमेरिकेने शुक्रवारी केली. बंदी घातलेल्या क्षेपणास्त्रांचा रशिया अजूनही विकास करत असून यामुळे या कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिखित निवेदन प्रसिद्ध करून हा निर्णय जाहीर केला. “रशिया गुप्तपणे बंदी घालण्यात आलेली क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करीत आहे. त्यामुळे आमच्या मित्रांना आणि परराष्ट्रातील सैनिकांना थेट धोका पोचतो,” असे या निवेदनात म्हटले आहे.

लघु अंतराच्या क्षेपणास्त्रांवर बंदी घालण्याकरिताचा हा करार 1987 मध्ये करण्यात आला होता. “या किंवा अन्य कोणत्याही कराराला एकतर्फी बांधील असलेला आपण जगातील एकमेव देश असू शकत नाही,” असे ट्रम्प म्हणाले.

महाशक्तींमधील शस्त्रस्पर्धेवर नियंत्रण आणणाऱ्या या कराराची समाप्ती झाल्यामुळे जगात नवीन शस्त्रस्पर्धा वाढू शकते, अशी चिंता विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. तसेच या कराराचा भाग नसलेल्या चीनने आशियामध्ये मोठ्या संख्येने क्षेपणास्त्र तैनात करून महत्त्वपूर्ण सैन्य लाभ मिळविला असल्याचे अमेरिकी तज्ञांचे मत आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ डिसेंबरच्या सुरुवातीला सांगितले होते, की या करारनाम्याचे पालन करण्यासाठी अमेरिका रशियाला 60 दिवसांची मुदत देईल. ही मुदत शनिवारी संपणार आहे.

“आम्ही रशियाला आपला रस्ता सुधारण्यासाठी बराच वेळ दिला आहे. उद्या ती वेळ संपेल,” असे पॉम्पिओ शुक्रवारी म्हणाले.

Leave a Comment