फेसबुक, ट्विटरवरून इराण, रशियाशी संबंधित खात्यांची पुन्हा हकालपट्टी

social-media
फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही कंपन्यांनी इराण, रशिया आणि व्हेनेझुएलाशी संबंधित शेकडो पृष्ठे आणि गट काढून टाकली आहेत. ही खाती सुनियोजित प्रभाव टाकण्यासाठी कारवाया करत होती, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.

फेसबुकने इराणशी संबंध असलेल्या आणि सुनियोजितपणे अनधिकृत वर्तणूक करणाऱ्या 783 पानांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे. यातील काही खाती 2010 पासून सक्रिय असून त्यांना फेसबुकवर 20 लाख अनुयायी आणि इन्स्टाग्रामवर 250,000 पेक्षा अधिक अनुयायी आहेत.

यातील अनेक खाती फ्रेंच, इंग्रजी, स्पॅनिश आणि हिब्रू भाषांमधून पॅलेस्टाईनच्या बाजूने साहित्य प्रचारित करत होते तर काही जण सौदी अरेबियाच्या धोरणांवर टीका करत होते, असे अमेरिकेच्या अटलांटिक काऊन्सिलच्या डिजिटल फोरेन्सिक रिसर्च लॅबने म्हटले होते.

दुसरीकडे, ट्विटरनेही रशिया, इराण आणि व्हेनेझुएलामधील हजारो खाती हटविल्याचे जाहीर केले आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अमेरिकेच्या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये या खात्यांवरून मर्यादित कारवाया झाल्या, मात्र त्यातील अनेक खाती मतदानाच्या आधीच निलंबित करण्यात आली, असे ट्विटरने म्हटले आहे.

ऑगस्ट 2018 मध्ये फेसबुकने अपप्रचार मोहीम राबविल्याच्या आरोपावरून इराण आणि रशियाशी संबंधित शेकडो खाती काढून टाकली होती. त्यावेळी गुगलनेही अशीच कारवाई करून 39 यूट्यूब चॅनेलवर कारवाई केली होती.

Leave a Comment