अन्न व औषध प्रशासन विभागाची पुण्यातील प्रसिद्ध अमृततुल्यावर कारवाई

tea
पुणे : पुण्यात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या अमृततुल्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केली आहे. एफडीएकडून विना परवाना तसेच विना नोंदणी चहा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. बुधवार पेठेतील प्रसिद्ध येवले अमृततुल्य तसेच साईबा अमृततुल्यच्या विविध शाखांवर कारवाई करण्यात आली आहे.

चहाचे अमृततुल्य गेल्या काही महिन्यात पुण्यात चर्चेचा विषय झाली आहेत. पुण्यात विविध ब्रॅंण्डचे अमृततुल्य विविध थीम्स आणि नागरिकांना आकर्षिक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टॅगलाईनसह सुरु झाले आहेत. या अमृततुल्यावर दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी असते. हे ब्रॅण्ड एवढे प्रसिद्ध झाले आहेत की शहरातील तसेच जिल्हातील विविध भागांमध्ये यांच्या अनेक शाखा सुरु झाल्या. दररोज लाखोंचा व्यवसाय या माध्यमातून होत आहे. पुणे आता या अमृतुल्यमुळे चहाचे कॅपिटल झाले आहे. त्यातच आता एफडीने विना नोंदणी तसेच विना परवाना चहा विक्री करणाऱ्या अमृतुल्यवर धडक कारवाई सुरु केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध अमृतुल्यावर कारवाई अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत जनहित व जनआरोग्य याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आली आहे. ही कारवाई एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी, इम्रान हवालदार व सोपान इंगळे यांच्या पथकाने केली.

Leave a Comment