फेसबुक-व्हाट्सअॅपचे एकत्रीकरण 2020 पूर्वी नाही – मार्क झुकेरबर्ग

mark-zukerburg
व्हाट्सअॅप, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राममधील चॅट्सचे एकत्रीकरण करण्याच्या फेसबुकच्या योजनेबाबत जगभरात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र हा एक दीर्घकालीन प्रकल्प असल्याचे स्पष्टीकरण कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याने दिले आहे.

एकत्रीकरण करण्याच्या योजनेचा इतक्यात विचार करणे घाईचे होईल, असे फेसबुकच्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना बुधवारी उशिरा झुकेरबर्ग याने सांगितले.

“या योजनेला अंतिम रूप देण्याआधी आम्हाला बरेच काही माहित करून घेणे आवश्यक आहे. हा एक दीर्घकालीन प्रकल्प असणार आहे. तो 2020 पर्यंत किंवा त्यापेक्षाही उशिरा होऊ शकतो,” असे झुकेरबर्ग याने सांगितले.

या अॅप्समधील चॅटच्या एकत्रीकरणाच्या व्यावसायिक फायद्यांपेक्षा त्यातील डेटा एन्क्रिप्शनबद्दल अधिक चिंता वाटत असल्याचे त्याने सांगितले.
व्हाट्सअॅप, मेसेंजर आणि इन्स्टाग्रामच्या चॅट सेवांचे एकत्रीकरण करण्याच्या विरोधात आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनने (डीपीसी) सोमवारी फेसबुकला इशारा दिला होता. या प्रस्तावाबाबत तत्काळ स्पष्टीकरण द्यावे, असे डीपीसीने म्हटले होते.

व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर हे तिन्ही माध्यम एकत्र होणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर झाले होते. यामध्ये फेसबुक मेसेंजरवरून व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर संदेश पाठवता येणार आहे, तर इन्स्टाग्रामवरून स्टोरी पोस्ट करता येणार आहे.

Leave a Comment