अमेरिकेत पुन्हा द्वेषजन्य कृत्य – हिंदू मंदिराची मोडतोड

police
अमेरिकेतील केंटुकी राज्यात आणखी एका द्वेषजन्य कृत्याची नोंद झाली असून येथील एका हिंदू मंदिरात मोडतोड करण्यात आली. मंदिरातील देवतेच्या मूर्तीवर काळा रंग ओतण्यात आला आणि मुख्य सभागृहातील खुर्चीवर चाकू रोवण्यात आला.

लुइसविला शहरात असलेल्या स्वामीनारायण मंदिरात रविवार रात्र ते मंगळवारच्या दरम्यान ही घटना घडली. देवतेच्या मूर्तीच्या विटंबनेसोबतच मंदिरातील खिडक्या तोडण्यात आल्या, भिंतींवर चुकीचे संदेश आणि चित्र रेखाटण्यात आले. या भिंतीवर ‘जीझस इज ओन्ली गॉड’ असे लिहिण्यात आले. तेथील सर्व कपाटे रिकामे करण्यात आली होती, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

केंटुकी प्रांतातील लुइसविला शहरात राहणाऱ्या भारतीय-अमेरिका समुदायात या घटनेमुळे रोष निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी ही घटना द्वेषजन्य गुन्हा असल्याचे सांगून त्याचा तपास सुरू केला आहे.

लुइसविलाच्या नागरिकांना अशा गुन्ह्यांच्या विरोधात उभे राहावे, असे आवाहन महापौर ग्रेग फिशर यांनी केले आहे. बुधवारी फिशर यांनी घटनास्थळाचा दौरा केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की आम्ही जेव्हा जेव्हा घृणा किंवा कट्टरपंथ पाहू तेव्हा त्याच्या विरोधात उभे राहू.

Leave a Comment