भारत सरकारने युबी समूहाची 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केली : विजय माल्ल्या

vijay-mallya
नवी दिल्ली : आपली 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा कर्जबुडवा उद्योगपती विजय माल्ल्याने केला आहे. विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय माल्ल्या ब्रिटनमध्ये पळाला. भारतात त्याला आणण्याचाही मार्ग आता मोकळा झाला आहे. पण माल्ल्याने नऊ हजार कोटींचे कर्ज असताना 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा केला.

विजय माल्ल्याने माझ्यासोबत अन्याय झाला असल्याचे म्हटले आहे. मी दररोज सकाळी उठतो तेव्हा एक नवी संपत्ती जप्त केल्याचे कळते. अगोदरच बँकांच्या कर्जाची व्याजासह रक्कम वसूल झाली आहे. पण अजून हे किती दिवस चालणार आहे आणि त्यापुढे काय असेल? असा सवाल विजय माल्ल्याने केला आहे. त्याने हे दावे एकापाठोपाठ ट्वीट करत केले आहेत.

एवढी संपत्ती जप्त करुनही माझ्याविरोधात लढण्यासाठी बँकांनी इंग्लंडमध्ये त्यांचे वकील दिले आहेत. नको ते आरोप या वकिलांकडून केले जात आहेत. या कायदेशीर प्रक्रियेवर लोकांचा जो पैसा खर्च केला जात आहे, त्याला जबाबदार कोण आहे, असे म्हणत विजय माल्ल्याने सरकारला सवाल करण्याचा प्रयत्न केला आहे.

एवढी संपत्ती तर जप्त केली आहेच, पण भारतातील माझ्याकडे कर्ज चुकवण्यासाठी ब्रिटनमध्येही पैसे मागितले जात आहेत. हे सर्वात मोठे दुर्दैव असल्याचेही विजय माल्ल्या म्हणाला. विविध बँकांचे विजय माल्ल्यावर नऊ हजार कोटींचे कर्ज आहे. कर्ज देण्यास असक्षम ठरल्यानंतर त्याने भारतातून पळ काढला. विजय माल्ल्याला इंग्लंडमधील वेस्टमिन्सटर कोर्टाने भारतात आणण्यासाठी परवानगी दिली आहे. पण माल्ल्या वरिष्ठ न्यायालायत या निर्णयाला आव्हान देणार आहे. वरिष्ठ न्यायालयात प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच माल्ल्याला भारतात आणले जाईल.

Leave a Comment