ट्रम्प अध्यक्ष व्हावेत ही ईश्वराची इच्छा – व्हाईट हाउस

donlad-trump
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विरोधकांची उणीव नाही. मात्र त्यांना ईश्वराची पाठिंबा असून ते अध्यक्ष व्हावेत, ही ईश्वराची इच्छा आहे असे ट्रम्प यांच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी म्हटले आहे.

क्रिश्चियन ब्रॉडकास्टिंग नेटवर्क (सीबीएन) या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सँडर्स यांनी हे वक्तव्य केले. सीबीएनचे पत्रकार डेविड ब्रॉडी यांनी या मुलाखतीनंतर ट्वीट करून सँडर्स यांच्या या दाव्याची माहिती दिली. बुधवारी ही मुलाखत प्रसिद्ध झाली.

‘‘आपण वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या भूमिका कराव्यात, ही ईश्वराची इच्छा असते असे मला वाटते. तसेच डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष व्हावेत, ही त्याचीच इच्छा होती,’’ असे त्या म्हणाल्या. त्यासाठीच ते या पदावर आले आहेत आणि सश्रद्ध लोकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी स्वतःच्या शपथविधीच्या वेळेस वापरलेले बायबल व बालपणी आईकडून मिळालेले बायबल वापरून ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली होती. तसेच रिपब्लिकन पक्षाचे नेते असलेल्या ट्रम्प यांना अमेरिकेतील राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असलेल्या इव्हँजेलिकल चळवळीचा पाठिंबा आहे.

Leave a Comment