
काँग्रेस पक्ष मुस्लिमांचा नक्कीच शत्रू आहे, मात्र भारतीय जनता पक्षापेक्षा तो बरा आहे, असे देशातील मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना असलेल्या जमीअत उलेमा-ए-हिंद या संघटनेने म्हटले आहे. भाजपने मुस्लिमांसोबतच त्यांच्या शरियतमधील अधिकारांवरही गदा आणल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस मुस्लिमांचा शत्रू, मात्र भाजपपेक्षा बरा – जमीअत उलेमा-ए-हिंद
गुरुवारी लखनऊ येथे जमीयतच्या जिल्हा प्रतिनिधींसमोर संघटनेचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. काँग्रेसने मुस्लिमांचे जरूर नुकसान केले आहे, मात्र त्याने आमच्या घटनेला कोणतेही नुकसान केले नाही, असे ते म्हणाल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती झाली हे चांगले झाले. धर्मनिरपेक्ष शक्तींची युती व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
मदरसे हे दहशतवादे अड्डे आहेत, या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना मौलाना मदनी म्हणाले, की मदरशांवर होणारे हल्ले हे सहन करण्याच्या पलीकडचे आहेत. उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यात हे वक्तव्य केले होते. देशातील मदरसे हे दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे प्राथमिक पातळीवरचे मदरसेबंद करावेत, असे त्यांनी म्हटले होते.
