अॅपलच्या गोपनीय माहितीची चोरी केल्याचा चिनी अभियंत्यावर आरोप

apple
जगप्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी अॅपलच्या गोपनीय प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे चोरल्याच्या आरोपावरून एका चिनी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील केंद्रीय तपास यंत्रणेने (एफबीआय) त्याच्या विरोधात कारवाई केली आहे.

जिझोंग चेन असे या अभियंत्याचे नाव असून त्याने अॅपलच्या स्वयंचलित कारशी संबंधित अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. चेन याला चीनला जाण्याच्या बेतात असताना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती, असे कॅलिफोर्नियातील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारीत म्हटले आहे. हे गोपनीय साहित्य बाहेर पडले तर अॅपलला प्रचंड मोठे नुकसान होऊ शकते, असे कंपनीने म्हटल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीतील माहितीनुसार, चेन याला स्वयंचलित कारच्या कागदपत्रांची छायाचित्रे वाईड अँगल लेन्सने घेताना एका सहकाऱ्याने पाहिले होते. तेव्हा त्याच्याकडे पहिल्यांदा संशयाची सुई वळली होती. त्यानंतर अॅपलने केलेल्या चौकशीत त्याच्या वैयक्तिक संगणकात गोपनीय माहिती असलेल्या 2000 पेक्षा अधिक फायली सापडल्या होत्या.

अॅपलच्या एखाद्या प्रकल्पाशी संबंधित साहित्याची चोरी करण्याच्या आरोपावरून चिनी नागरिकावर कारवाई होण्याची ही सहा महिन्यातील दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध भडकलेले असताना ही कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment