एक्स्लुझिव्ह डील देण्यावर बंदी; अ‍ॅमेझॉनने हटवली अनेक उत्पादने

amazon
नवी दिल्ली – अ‍ॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना एक्स्लुझिव्ह डील ग्राहकांना देण्यावर केंद्र सरकारने बंदी आणली आहे, ज्यामध्ये उत्पादनांच्या किंमती प्रभावित होऊ शकतील. याचबरोबर भागीदारी असलेल्या कंपन्यांची उत्पादनेही या कंपन्यांना विकता येणार नाहीत. ई कॉमर्स कंपन्यांना केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या धोरणामुळे भारतातील आपल्या व्यवसायामध्ये बदल करावे लागणार आहेत. दरम्यान अनेक वस्तू अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवरून हटविण्यात आल्या आहेत.

1 फेब्रुवारी 2019 पासून ऑनलाईन रिटेलमध्ये एफडीआयचे नवीन नियम लागू झाले आहेत. कोणताही भेदभाव न करता एकसारखी सुविधा सर्व पुरवठादारांना देण्यात यावी. आपल्या उत्पादनांच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादने कोणत्याही पुरवठादाराला (व्हेंडर) ऑनलाईन विकता येणार नाहीत. शिवाय केवळ आपल्याच प्लॅटफॉर्मवर त्या पुरवठादाराला त्याची उत्पादने विकण्याची सक्ती करू शकणार नाहीत. याचाच अर्थ आता कोणताही मोबाईल किंवा वस्तू सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे, असे यामध्ये या कंपन्यांना सांगण्यात आले आहे.

कॅशबॅकचा ग्राहकांना दिला जाणारा फायदा निष्पक्ष आणि भेदभाव करणारा असता कामा नये. हे नियम पाळण्यासंबंधात कंपन्यांना दरवर्षी 30 सप्टेंबरला आरबीआयकडे प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. भारतीय कंपन्यांना एफडीआयमुळे उतरती कळा लागण्याची भीती व्यक्त होत असल्यामुळे हा निर्णय या कंपन्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. एफडीआयमुळे मोठ्या प्रमाणावर पैसा मिळू लागल्याने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर सूट देत होत्या. यामुळे भारतीय कंपन्यांना नुकसान होत होते.

Leave a Comment