व्हेनेझुएलातून 20 टन सोने नेण्याची योजना उधळली

Venezuela
व्हेनेझुएलाच्या केंद्रीय बँकेतून मंगळवारी एका रशियन विमानात 20 टन सोने नेण्याची योजना होती. देशातील एकूण सोन्याच्या 20 टक्के एवढे हे सोने होते आणि त्याची किंमत 84 कोटी डॉलर एवढी होती, असा दावा देशाच्या एका संसद सदस्याने केला आहे.

एका रशियन विमान कंपनीच्या बोइंग 777 विमानात हे सोने ठेवण्यात येणार होते. कॅराकस येथे मंगळवारी हे विमान उतरले होते, असे या संसद सदस्याने ट्विटरवर म्हटले आहे. जोस गुएरा असे या नेत्याचे नाव असल्याचे नोटिसियास व्हेनेझुएला या संकेतस्थळाने म्हटले आहे. गुएरा यांनी आपल्या दाव्यासाठी पुरावा दिला नाही. मात्र ते देशाच्या केंद्रीय बँकेचे माजी अर्थतज्ञ असून तेथील कर्मचाऱ्यांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे.

हे सोने सोन्याच्या सळयांच्या स्वरूपात होते. ते कुठे नेले जाणार होते, हे समजू शकले नाही. मात्र विमानात ठेवण्यासाठी हे सोने बाजूला ठेवले होते, असे सूत्रांनी ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेला सांगितले.

व्हेनेझुएलाचे अर्थमंत्री सायमन झर्पा यांनी या सोन्याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र कॅराकसमधील सायमन बोलिव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रशियन विमान असल्याचे नाकारले.

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मदुरो यांना रशियाचा पाठिंबा असून व्हेनेझुएलाला रशियाने कोट्यवधी डॉलरचे कर्ज दिले आहे.

Leave a Comment