सोनिया गांधींचा दूत राज ठाकरेंच्या भेटीला

ahmed-patel
मुंबई – काँग्रेस नेते अहमद पटेल यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्या विवाहसोहळ्यात उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. लग्नानिमित्त आलेल्या अहमद पटेल आणि राज ठाकरे यांच्यात २० मिनिटे खासगीत बैठक झाल्याचे वृत्त असून राज ठाकरे देखील या बैठकीनंतर महाआघाडीत सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय या विवाहसोहळ्यात उपस्थित होते. या विवाहसोहळ्यासाठी राज ठाकरेंनी राहुल गांधी यांना देखील निमंत्रण दिले होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या वतीने या विवाहसोहळ्यात अहमद पटेल हे सहभागी झाले होते. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून अहमद पटेल हे ओळखले जातात.

या संदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अहमद पटेल यांची राज ठाकरे यांनी खासगीत भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण सद्यपरिस्थिती पाहता मनसेचा महाआघाडीत समावेश करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment