अमेरिकेचे गुप्तचर भोळसट, त्यांना पुन्हा शिकवायची गरज – ट्रम्प यांचा टोला

donald-trump
अमेरिकेचे गुप्तचर भोळसट असून इराणबाबत त्यांची माहिती पूर्णपणे चुकीची निघाली. या हेरांना परत शिकवायची गरज आहे, असा टोला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लगावला आहे.

इराणचे इस्लामी गणतंत्र पश्चिम आशियात अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करत असून क्षेपणास्त्रांची चाचणी घेत आहे. अशा वेळेस अमेरिकेचे गुप्तचर मात्र भोळसट असल्याची टीका ट्रम्प यांनी बुधवारी ट्विटरवर दिलेल्या वक्तव्यात केली आहे.

“इराणच्या धोक्यांबाबत गुप्तचर खात्याचे लोक अत्यंत निष्क्रिय आणि भोळसट असल्याचे दिसते. गुप्तचरांनी कदाचित पुन्हा परत शाळेत जायला हवे,” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात एका इराणी क्षेपणास्त्र चाचणीचा उल्लेख करून इराण कडेलोटाच्या जवळ येत असल्याची मोघम टीका केली होती. त्यांचीअर्थव्यवस्था आता कोसळत आहे आणि हीच गोष्ट त्यांना मागे खेचत आहे, असे ते म्हणाले होते.

इराणशी 2015 मध्ये झालेल्या अणुकरारातून अमेरिका माघार घेत असल्याची घोषणा ट्रम्प यांनी गेल्या वर्षी केली होती. हा करार बराक ओबामा यांच्या काळात झाला होता. इराण दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Leave a Comment