महात्मा गांधीच्या प्रतिमेस प्रतिकात्मक बंदुकीने हिंदू महासभेच्या महिलेने घातल्या गोळ्या - Majha Paper

महात्मा गांधीच्या प्रतिमेस प्रतिकात्मक बंदुकीने हिंदू महासभेच्या महिलेने घातल्या गोळ्या

viral
अलिगड – काल राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथिनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना विनम्रपणे अभिवादन करत होते, तर राष्ट्रपितांच्या प्रतिमेवर प्रतिकात्मक बंदुकीने हिंदू महासभेची महिला गोळ्या झाडत होती. उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये हा निंदनीय प्रकार घडला असून, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काल गांधीजींची ७१ वी पुण्यतिथि होती. त्यांना देशभरातून अभिवादन केले जात असताना शरमेने मान खाली घालावी, अशी घटना अलिगडमध्ये घडली. गांधींचे भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान सर्वश्रुत आहे. पण, गांधी देशाच्या फाळणीला जबाबदार असल्याची आवई हिंदू महासभा उठवत असल्यामुळे या संघटनेने काल महात्मा गांधींच्या हत्येचा दिवस नथूरामच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आनंदात साजरा केला. नथूरामच्या प्रतिमेस हिंदू महासभेची राष्ट्रीय महासचिव पूजा शकून पांडे हिने पुष्पहार घातला आणि महात्मा नथूराम गोडसे अमर रहे…, अशा घोषणाही दिल्या. त्याचबरोबर तिने महात्मा गांधीच्या प्रतिमेस प्रतिकात्मक बंदुकीने गोळ्या घातल्यानंतर तिने उपस्थितांना पेढे वाटले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिंदू महासभेला या कृतीमुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ३० जानेवारी १९४८ नथूराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती. पुढे गोडसेला दोषी ठरविण्यात आले आणि त्याला फाशीही देण्यात आली.

महात्मा गांधीचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान आणि त्याग प्रत्येक भारतीयांना माहीत आहे. ब्रिटीश वसाहत कायद्याच्या जोखडातून देशाला मुक्त करणारे गांधी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हटले जाते. शेवटपर्यंत अहिंसेच्या मार्गावर चालणारे गांधी कट्टर हिंदू धर्मांधाचे बळी ठरले. आजही गोडसेचे खुले समर्थन करणारे अनेकजण आहेत. पण, त्यांनी गांधींच्या प्रतिमेस गोळ्या घालून देशाच्या राष्ट्रपिताची विटंबना केली. हा देशद्रोह आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.

Leave a Comment