शबरीमला मंदिराला आर्थिक मदत करा – देवस्थान बोर्डाची सरकारकडे मागणी

sabarimala
गेले अनेक महिने वादात सापडलेल्या शबरीमला येथील भगवान अयप्पा मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या त्रावणकोर देवस्वम मंडळाने (टीडीबी) सरकारकडे आर्थिक मदत मागितली आहे. मकर संक्रांतीच्या वेळेस साजऱ्या करण्यात आलेल्या मंडल-मकरविळक्कु उत्सवाच्या वेळेस महसूलात घट झाल्याने मंडळाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

सरकारकडे मागण्यात येणारी रक्कम अद्याप निश्चित ठरलेली नाही. मात्र मंडळाच्या सदस्यांना राज्याच्या अर्थसंकल्पात शबरीमलाच्या विकासासाठी किमान 250 कोटी रुपये वेगळे ठेवण्यात येतील, अशी अपेक्षा असल्याचे सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

मंडल-मकरविळक्कु उत्सव जवळजवळ दोन महिने चालतो मात्र या काळात मंदिराच्या परिसरात तीव्र स्वरूपाची निदर्शने झाली होती. तसेच ऑगस्टमध्ये आलेल्या पूर आणि त्यानंतर मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यावरून झालेल्या निदर्शनांमुळे यावर्षी हुंडी संकलन आणि ‘प्रसाद’ विक्रीत 100 कोटी रुपयांची घट झाली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी टीडीबीच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारे देणगी न टाकण्याचे आवाहन भक्तांना केले आहे.

शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात सर्व महिलांना प्रवेश द्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिला होता. त्या आदेशानंतर हे मंदिर सातत्याने वादाने सापडले आहे.

Leave a Comment