स्टेट बँकेच्या निष्काळजीपणामुळे बँक बॅलेन्स आणि महत्त्वाची माहिती लीक!

state-bank-of-india
मुंबई – स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) बुधवारी ग्राहकांची महत्त्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणत्याही सुरक्षेविना ठेवले होते. हजारो ग्राहकांची महत्त्वाची माहिती मुंबईत असणाऱ्या या सर्व्हरमध्ये होती, जी लीक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँक बॅलेन्स, खाती क्रमांक याच्यासहित काही महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय आहे.

याबाबत टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, सर्व्हरचा पासवर्ड टाकण्यास बँक विसरल्यामुळे सर्व्हरमधून ग्राहकांची माहिती कशी मिळवली जाते याची कल्पना ज्यांना आहे त्यांनी याचा गैरवापर केल्याची शक्यता आहे. किती वेळासाठी सर्व्हर सुरक्षेविना होता याची माहिती मिळू शकली नाही. पण टेकक्रंचने ज्यावेळी एसबीआयशी संपर्क साधला तेव्हा ही समस्या सोडवण्यात आली होती. याप्रकरणी एसबीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही.

रिपोर्टनुसार, सुरक्षा नसलेला हा सर्व्हर हा बँकेच्या एसबीआय क्विक सेवेचा भाग होता. ग्राहक यावरुन सामान्य माहिती मिळवण्यासाठी मेसेज किंवा मिस कॉल देऊन ती माहिती मिळवू शकतात. आपल्या वेबसाइटवर बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय क्विक – मिस कॉल बँकिंग ही मोफत सेवा असून तुम्ही तुमचा बॅलेन्स, मिनी स्टेटमेंट आणि इतर माहिती आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन एसएमएस किंवा मिस कॉल देऊन मिळवू शकता.

Leave a Comment