राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी – शिक्षकाचे निलंबन रद्द

Rahul-Gandhi

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले होते. मात्र खुद्द मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हस्तक्षेप केल्यामुळे या शिक्षकाचे निलंबन रद्द करण्यात आले.

बालेश्वर पाटीदार असे या शिक्षकाचे नाव असून तो रतलाम येथील आहे. जिल्ह्यातील तालोद येथे शासकीय प्राथमिक विद्यालयात पाटीदार हे शिक्षक आहेत. राहुल गांधी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. ही माहिती मिळताच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिक्षकाला पुन्हा घेण्याचे आदेश दिले, असे आयएएनएस वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

“शिक्षक पाटीदार यांच्या निलंबनाची माहिती आताच मिळाली. त्यांच्यावर निश्चितच नियमानुसार कारवाई झाली असावी, कारण सरकारी सेवेत असताना अशी वागणूक नागरी सेवा नियमांच्या विरुद्ध आहे. यापूर्वी माझ्याबाबतही जबलपूरच्या एका शिक्षकाने डाकू शब्दाचा वापर केला होता. त्यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात आली होती.” असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

ज्या शिक्षकाचे निलंबन झाले आहे, त्याने या पदावर येण्यासाठी अनेक वर्षे मेहनत केली असेल. या शिक्षकाच्या चुकीची शिक्षा त्यांच्या कुटुंबियाला होऊ नये, असे मला वाटते असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

कमलनाथ यांनी खुद्द राहुल गांधी यांचे उदाहरण दिले असून ते अशोभनीय टिप्पणी आणि शेरेबाजी करणाऱ्या विरोधकांनाही माफ करतात. एका शिक्षकाला माझ्या सरकारमध्ये निलंबित करावे, हे त्यांच्या विचारांच्या विरोधी आहे, असा दावा केला आहे.

Leave a Comment