जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकात 2018 मध्ये भारत पुढे, चीन मागे

corruption
भारताने जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकात 2018 मध्ये आपली स्थिती सुधारली आहे, तर भारताचा शेजारी चीन खूप मागे पडला आहे, असे एका भ्रष्टाचारविरोधी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. मंगळवारी या संघटनेचा अहवाल जाहीर करण्यात आला.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने ‘करप्शन पर्सेप्शन इंडेक्स’ (सीपीआय) हा 2018 वर्षीचा अहवाल जाहीर केला. यात भ्रष्टाचाराच्या संदर्भात 180 देशांची क्रमवारी लावण्यात आली आहे. त्यात भारताच्या स्थितीत तीन स्थानांनी सुधारणा झाली असून तो 78 व्या स्थानी पोचला आहे. चीनला या यादीत 87वे स्थान आणि पाकिस्तानला 117वे स्थान मिळाले आहे, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

“भारतात निवडणुका उंबरठ्यावर आलेल्या असताना त्याच्या सीपीआय गुणांमध्ये किंचित लक्षणीय सुधारणा दिसली. भारताचे गुण 2017 मध्ये 40 होते ते 41 वर आले,” असे सीपीआय अहवालात म्हटले आहे.

या यादीत अनुक्रमे 88 आणि 87 एवढे गुण मिळविणाऱ्या डेन्मार्क आणि न्यूझीलंड या देशांनी अग्रस्थान पटकावले. सोमालिया, सीरिया आणि दक्षिण सुदान यांना 10, 13 आणि 13 गुणांसह तळाचे स्थान मिळाले आहे. सर्वसामान्यपणे दोन तृतीयांश देशांना 50 पेक्षा कमी गुण मिळाले असून सरासरी 43 गुण मिळाले आहेत.

Leave a Comment