डीएचएफएलच्या प्रवर्तकांनी बोगस कंपन्यांच्या आधारे केला ३१,५०० कोटींचा घोटाळा

DHFL
नवी दिल्ली – हजारो कोटींचा घोटाळा गृह वित्त क्षेत्रातील प्रमुख कंपनी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून (डीएचएफएल) करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून हा आरोप कोब्रापोस्ट या संकेतस्थळाकडून करण्यात आला आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, बोगस कंपन्यांच्या आधारे ३१,५०० कोटींचा घोटाळा डीएचएफएलच्या प्रवर्तकांनी केला आहे. हे वृत्त समोर येताच डीएचएफएलचे शेअर आठ टक्क्यांनी गडगडले.

बोगस कंपन्यांच्या आधारे डीएचएफएलच्या प्रवर्तकांनी हजारो कोटींचा चुना लावला आहे. कथित रूपात विविध बनावट आणि छद्म कंपन्यांद्वारे प्रवर्तकांनी ३१,५०० कोटींचा निधी वळता करून फस्त केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. बोगस कंपन्यांना डीएचएफएलने कर्ज दिले असल्याचे दाखवले आणि नंतर ही रक्कम पुन्हा प्रवर्तकांकडे जमा करण्यात आली. डीएचएफएलच्या प्रवर्तकांकडेच बोगस कंपन्यांची मालकी होती. अशाप्रकारे ३१,५०० कोटींचा घोटाळा करण्यात आला. या पैशांच्या सहाय्याने भारताशिवाय श्रीलंका, दुबई, इंग्लंड आणि मॉरिशसमध्ये डीएचएफएलच्या प्रवर्तकांनी संपत्ती खरेदी केली.

डीएचएफएल समूहाला जवळपास ३२ भारतीय आणि विदेशी बँकांनी सुमारे ९७,००० कोटी रुपये कर्जरूपात दिले आहेत. तर प्रवर्तकांकडून हाच पैसा स्थापित छद्म कंपन्यांना कर्जरूपात अदा करून, जवळपास ३१,५०० कोटी रुपये फस्त केले गेले, असा आरोप कोब्रापोस्ट या संकेतस्थळाने डीचएफएल समूहावर केला आहे. बहुतांश छद्म कंपन्यांचे पत्ते, त्यांचे संचालक आणि लेखापरीक्षक एकसारखेच असल्याचेही आरोपात म्हटले गेले असून, हा देशातील सर्वात मोठा वित्तीय घोटाळा असल्याचा या संकेतस्थळाचा दावा आहे. कोब्रा पोस्टच्या रिपोर्टनुसार, भाजपला डीएचएफएलने २० कोटी रुपयांचा निधीही दिला होता. पण यासंदर्भात कंपनीने ना कोणता खुलासा केला ना कुठेही याची नोंद दर्शवली.

Leave a Comment