भटक्या गाईंना बारकोड लावा – उत्तर प्रदेश सरकारचा आदेश

Barcode
भटक्या जनावरांच्या समस्येवर एक अनोखा उपाय उत्तर प्रदेश सरकारने शोधला आहे. भटक्या गाईंना बारकोड लावा आणि वापरात नसलेल्या सरकारी इमारतींमध्ये गुरांसाठी तात्पुरते गोठे उभारा, असे या आदेशात म्हटले आहे.

राज्य सरकारच्या वतीने सोमवारी हे परिपत्रक काढण्यात आले. यापूर्वी काही आठवड्यांआधी सरकारने गुरांसाठी पांजरपोळ उभारण्यासाठी अधिभार लावण्याची घोषणा केली होती.

“विविध सहकारी संस्थांमध्ये (उदा. मंडी परिषद व साखर कारखाने) आणि बंद पडलेल्या केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये तात्पुरत्या गोठे काढता येऊ शकतात,” असे या आदेशात म्हटले असल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. शक्य असल्यास भटक्या पशूंना बारकोड आणि आरएफआयडी टॅग करावे, असा सल्लाही आदेशात देण्यात आला आहे. आरएफआयडीमध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.

राज्य पशुसंवर्धन विभागाने काढलेला हा आदेश 23 पानांचा असून लखनऊतील सर्व वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना तो पाठविण्यात आला आहे. राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी भटकी जनावरे सरकारी शाळांमध्ये नेल्याच्या तसेच त्यामुळे त्या संस्थांच्या कामकाजावर परिणाम झाल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांनी दिल्या होत्या. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Leave a Comment