
भारतासोबत होणारी शांतता चर्चा निवडणूक निकालांनंतरच परत सुरू करण्यात येईल, असे पाकिस्तानच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने म्हटले आहे. सध्याच्या सरकारकडून कोणतेही मोठे निर्णय होणे अपेक्षित नाहीत त्यामुळे भारताशी चर्चा करणे निष्फळ ठरेल, असे या मंत्र्याने म्हटले आहे.
निवडणुकीनंतरच पाकिस्तान भारताशी पुन्हा चर्चा करणार : मंत्री
भारतीय नेते आगामी आगामी सार्वत्रिक निवडणुकांची तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही, असे पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी हे दुबईत म्हणाल्याचे गल्फ न्यूज वृत्तपत्राने म्हटले आहे.
“जोपर्यंत काही स्थैर्य येत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा करणे निरुपयोगी ठरेल. निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही पुढे जाऊ. भारतीय जनतेने निवडलेल्या कोणत्याही भारतीय नेत्याचा पाकिस्तान सरकार आदर करेल,” असे ते म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कर्तारपूर मार्गिका सुरू होणे ही लक्षणीय घटना आहे. यामुळे केवळ शीख समुदायालाच नव्हे तर भारत-पाकिस्तान संबंधांनाही फायदा होईल, असे चौधरी यांनी सांगितले.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत-पाक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन देशांमध्ये 2017 मध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे हे संबंध अधिकच दुरावले होते. दहशतवाद आणि चर्चा एकत्र असू शकत नाही, अशी भारताची भूमिका आहे.
