फुटीरवाद्यांकडून भारतीय ध्वजाचे दहन – ब्रिटनकडून खेद व्यक्त

ind-f
प्रजासत्ताक दिनी लंडनमधील भारतीय उच्चायोगाच्या बाहेर फुटीरवाद्यांनी तिरंगा ध्वजाचे दहन केले. या प्रकरणी ब्रिटन सरकारने सोमवारी खेद व्यक्त केला.

फुटीरवादी कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे कृती केली याबद्दल आम्हाला वाईट वाटते, असे परराष्ट्र आणि राष्ट्रकुल कार्यालयाने (एफसीओ) म्हटले आहे. शनिवारी घडलेल्या या प्रकारणात नक्की काय घडले याचा तपास स्कॉटलंड यार्ड करत आहे.
लंडनमध्ये काही ब्रिटीश शीख आणि कश्मीरी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या गटांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त निदर्शने आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी इंडिया हाऊसच्या बाहेर भारतीय ध्वज जाळला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फलक उंचावून भारतविरोधी घोषणा दिल्या होत्या.

“कोणाही व्यक्तीने कोणत्याही दिवशी, खासकरून प्रजासत्ताक दिनी, भारतीय ध्वज जाळावा हे निराशाजनक आहे. यामुळे होणाऱ्या मनस्तापाचा आम्हाला खेद आहे,” असे एफसीओच्या प्रवक्त्याने सांगितल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
“आम्ही भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि युरोपीय संघ सोडून महत्त्वाच्या जागतिक सहयोगींबरोबर नवीन भागीदारी करण्याच्या तयारीत असताना आमचे संबंध अधिक गहन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे प्रवक्त्याने सांगितले.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लंडनमधील कॉमनवेल्थ हेड ऑफ गव्हर्नमेंट (सीएचओजीएम) बैठकीनंतर पार्लमेंट स्क्वेअरमध्ये अशाच प्रकारे काही फुटीरवाद्यांनी भारतीय ध्वजाचा अवमान केला होता. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भारतीय सरकारने केली होती.

Leave a Comment