केंद्रात सत्ता आल्यास काँग्रेस प्रत्येक गरीबाला देणार किमान वेतन

rahul-gandhi
रायपूर – छत्तीसगड येथील अटल नगर येथे बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक गरीबाला किमान वेतन दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही मोठी घोषणा असून याचा मतदारांवर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राहुल गांधींनी यावेळी किमान वेतन प्रत्येक गरीबाच्या खात्यात जमा केले जाईल. तो गरीब किंवा त्याचे कुटुंब उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेतली जाईल. अशा प्रकारचा एकही निर्णय आताच्या सरकारने घेतला नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. पण तो चुनावी जुमला असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता या घोषणेचा काँग्रेसला निवडून येण्यासाठी फायदा होईल का आणि त्यानंतर हे वचन पूर्ण केले जाईल का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.

काँग्रेसला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये यश आले. काँग्रेसने या निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर ते पूर्णही केले. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, केंद्रीय अर्थसल्लागार, अर्थसचिव आणि विविध अर्थतज्ज्ञांनी या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली होती. यामुळे सरकारी तिजोरी, सरकारी बँका आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असे म्हटले होते. राजकीय युद्धात देशाच्या अर्थव्यवस्थेचा बळी जाईल, असे तज्ज्ञांनी म्हटलेले असतानाही तीनही राज्यांमध्ये काँग्रेसने सरसकट कर्जमाफी केली होती. आता राहुल गांधी यांनी गरीबांना किमान वेतन देण्याची घोषणा केली आहे. हे आश्वासन कसे पूर्ण करणार आणि त्याचा परिणाम ही दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने ठरू शकतात.

Leave a Comment