गोवा विमानतळावर देशातील पहिले ‘जीआय’ स्टोर सुरू

suresh-prabhu
पणजी – दाबोळी-गोवा विमानतळावर देशातील पहिले जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) स्टोर सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी या स्टोरचे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी उद्घाटन केले. हे स्टोर भारतीय काजू निर्यात संवर्धन परिषद, स्पायसेस बोर्ड आणि विमान प्राधिकरण यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आले. सुरेश प्रभू यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले.

जीआयच्या माध्यमातून प्रत्येक भागातील उत्पादनाचे वैशिष्ट्य जपले जाते. त्यामुळे दुसरे कोणीही त्या उत्पादनाची नक्कल करू शकत नाही. जीआय स्टोरच्या माध्यमातून देशातील अशा शेतमाल आणि हस्तकलांना जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. गोव्यातून याची सुरुवात करण्यात आली आहे. देशातील सध्या कार्यरत असणाऱ्या १०१ आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या १०० विमानतळावर जीआय स्टोर सुरू केले जाणार आहेत. विमान प्राधिकरणाने त्यासाठी मान्यताही दिली असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी यावेळी बोलताना दिली.

इलेक्ट्रॉनिक्स मार्केटिंगच्या माध्यमातून सरकार स्थानिकांचा शेतमाल खरेदी करणार आहे. त्यानंतर त्याची जीआय स्टोरच्या माध्यमातून विक्री केली जाईल. यामुळे स्थानिक शेतकरी आणि युवकांना रोजगाराची संधी मिळेल, असेही प्रभू यांनी स्पष्ट केले. देशविदेशात सागरी उत्पादनांनाही बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या स्टोरची रचना नॅशनल इंस्टिस्ट्यूट ऑफ डिझाईनने केली आहे. हिच रचना देशातील प्रत्येक ठिकाणी असेल, असेही प्रभू यावेळी म्हणाले. याव्यतिरिक्त गोव्यातील सेवा क्षेत्रातील विकासासाठी केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देणार आहे. त्यासाठी गोवा सरकारने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही प्रभू यांनी यावेळी केली.

Leave a Comment