पोंझी स्कीम गैरव्यवहार – टीएमसीच्या खासदाराची 238 कोटींची संपत्ती जप्त

ponzi-scheme-case
पोंझी स्कीम गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी मोठी कारवाई करत तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची 238 कोटींची संपत्ती जप्त केली. यात या खासदार महाशयांचे रिसॉर्ट, शोरूम आणि बँक खात्याचा समावेश आहे.

के. डी. सिंह असे या खासदाराचे नाव आहे. सिंह यांच्या कुर्फी येथील रिसॉर्ट, चंडीगढमधील शोरूम, पंचकूला येथील मालमत्ता आणि बँक खाते ईडीच्या वतीने जप्त करण्यात आले.

सिंह यांच्या अल्केमिस्ट इन्फ्रा रिअल्टी लिमिटेड या कंपनीवर ईडीने सप्टेंबर 2016 रोजी गुन्हा नोंदवला होता. पीएमएलए या कायद्यांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. के. डी. सिंह यांच्या कंपनीने लोकांना सुमारे 1900 कोटी रुपयांचा गंडा घातला होता, असा त्यांच्यावर आरोप आहे. सेबीच्या वतीनेही कंपनी, तिचे संचालक आणि भागधारकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

के. डी. सिंह हे टीएमसीत येण्यापूर्वी झारखंड मुक्ति मोर्चा पक्षाचे सदस्य होते. ते 2010 मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी टीएमसीत प्रवेश केला होता. टीएमसीत त्यांच्या पश्चिम भारतीय राज्यांची जबाबदारी असून यात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. राज्यसभा खासदारपदासोबतच त्यांच्याकडे भारतीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्षपद आहे.

Leave a Comment