‘या’ अवलियाने बनवले भूसुरुंग शोधून निकामी करणारे ड्रोन

Harshwardhan-Zala
सध्याच्या घडीला सगळीकडे उरी चित्रपटाची चर्चा आहे. तर सध्या अनेक नेते मंडळींच्या भाषणाची सुरुवात या चित्रपटामधील ‘हाऊस द जोश?’ या संवादाने होते. या चित्रपटातील आणखीन एक चर्चेची गोष्टी ठरली ती म्हणजे ‘गरुड’ हे आगळेवेगळे ड्रोन. हेरगिरीसाठी या चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे या पक्षासारख्या दिसणाऱ्या ड्रोनचा उपयोग करण्यात आला. पण एका १६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याने आता खरोखरच अशाप्रकारचे ड्रोन बनवले आहे. हे ड्रोन हेरगिरीऐवजी भूसुरुंगांची जागा ओळखून ते नष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
Harshwardhan-Zala1
हे ड्रोन अहमदाबादमधील हर्षवर्धनसिन्हा झाला या १६ वर्षीय विद्यार्थ्याने तयार केले असून त्याने या ड्रोनला ‘इगल ए सेव्हन’ असे नाव दिले आहे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून हर्षवर्धनसिन्हा हा वेगवेगळी स्मार्ट गॅजेट्स बनवतो. ‘अॅरोबॉटिक्स सेव्हन’ नावाच्या कंपनीची स्थापना रोबोटिक्सची आवड असणाऱ्या हर्षवर्धनसिन्हाने केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून जीवन अधिक सोप्पे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल असे हर्षवर्धनसिन्हा सांगतो.
Harshwardhan-Zala3
हर्षवर्धन आपल्या या नवीन भूसुरुंग शोधून काढणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल बोलताना म्हणतो, अशाप्रकारचे तंत्रज्ञान सध्या कुठेच उपलब्ध नाही. हे ड्रोन भारतीय लष्कर आपल्या छावणीमधून रिमोटच्या सहाय्याने ऑपरेट करु शकेल. लष्कराला या ड्रोनच्या मदतीने भूसुरुंग शोधून काढून ते निकामी करणे सहज शक्य होईल. भूसुरुंग या ड्रोनला सापडला की तो छावणीमधील अधिकाऱ्यांना संदेश पाठवेल. त्यानंतर या ड्रोनवरील कॅमेरातून तो भूसुरुंग तेथील अधिकाऱ्यांना पाहता येईल. तसेच या ड्रोनच्या मदतीने हा भूसुरुंग कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय लगेच निकामी करता येईल. द क्विंटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे ड्रोन कसे काम करते यासंदर्भात हर्षवर्धनसिन्हाने माहिती दिली.
Harshwardhan-Zala3
याबाबत ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार हर्षवर्धनसिन्हाच्या या संशोधनाला परदेशातून मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. पण ती ऑफर हर्षवर्धनसिन्हाने नाकारली असून हे तंत्रज्ञान आपल्याला केवळ भारतीय लष्कराला पुरवायचे असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. हर्षवर्धनसिन्हा परदेशातील ऑफर्सबद्दल बोलताना म्हणतो, मला दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स, दुबई आणि थायलंड यासारख्या देशांमधील कंपन्यांनी पार्टनरशिपची ऑफर दिली होती. तेथे येऊन आम्ही कंपनी सुरु करावी असे त्या कंपन्यांनी आम्हाला सांगितले होते. या कंपन्यांनी हर्षवर्धनसिन्हाला कंपनी स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यात येईल असेही सांगितले. हर्षवर्धनसिन्हाच्या कंपनीने एवढ्या साऱ्या ऑफर्स येऊनही त्या सर्व नाकारल्या आहेत.

Leave a Comment