असा बनतो आपला तिरंगा

flag
देशाचा मानबिंदू, भारताची आन, बान आणि शान असलेला तिरंगा कसा आणि कुठे बनतो याची अनेकांना कल्पना नसेल. ब्युरो ऑफ इंडिअन स्टँडर्डने घालून दिलेल्या नियमानुसार आणि भारतीय ध्वज संहितेनुसार याचा परवाना कर्नाटकातील हुबळी येथे असलेल्या कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ या एकमेव संस्थेकडे आहे. ज्यापासून आपला तिरंगा बनतो त्यासाठी लागणारे खादीचे कापड बालकोट जिल्ह्याच्या एका गावात मजूर बनवितात.

१९५७ साली हा खादी संघ सुरु झाला असून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांकडून येथे खादी खरेदी केली जाते. तिरंगा मिळण्यासाठी किमान दोन महिने अगोदर नोंदणी करावी लागते. या संस्थेत वर्षाला २६ ते ३० हजार तिरंगे तयार केले जातात. त्यातून संघाला ३ कोटींचे उत्पन्न मिळते. ५०० लोकांची एक टीम तिरंगे बनविण्यासाठी कार्यरत असून त्यात ९० टक्के महिला आहेत. त्यातील बहुसंख्य गृहिणी आहेत.

नियमानुसार तिरंगा १२ फुट बाय ८ फुट या आकारात असतो. तो सहा प्रक्रियातून तयार होतो. प्रथम कताई केली जाते, नंतर कपडा विणला जातो, रंगविला जातो, त्यानंतर त्यावर चक्र छपाई होते त्यानंतर शिलाई आणि बंधाई केली जाते. तिरंगा तयार करताना एकही चूक मान्य केली जात नाही. अशी चूक झाल्यास तो गुन्हा समजाला जातो आणि त्यासाठी दंड व शिक्षेची तरतूद केली गेली आहे.