नवी दिल्ली – हिंदू संन्यासांना भारतरत्नसारखे पुरस्कार मिळत नाही. हिंदू असणे म्हणजे या देशात गुन्हा आहे का? असा प्रश्न योग गुरू बाबा रामदेव यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पत्रकारांसमोर हा प्रश्न देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारावर प्रतिक्रिया देताना उपस्थित केला. या सरकारने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार जाहीर केले, असे सर्वच स्तरातून म्हटले जात आहे.
विवेकानंद आणि महर्षि दयानंद यांना भारतरत्न का भेटू नये? – रामदेव बाबा
यावर्षी ३ जणांना देशाचा सर्वात मोठा नागरी सम्मान असलेला भारत रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस नेते प्रणब मुखर्जीसह भूपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांचा त्यामध्ये समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्यापासूनच देशभरातून यावर प्रतिक्रिया येत आहे. सरकार आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काय खेळी खेळणार याचे या पुरस्कारात प्रतिबिंब उतरले असल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. बाबा रामदेव हेही त्यानंतर या पुरस्कारांवर खुष झालेले दिसत नाहीत.
रामदेव बाबांनी या पुरस्कारावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतरत्न विवेकानंद आणि महर्षि दयानंद यांना का भेटू नये? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते त्यावर पुढे बोलताना म्हणाले, कोणत्याच संन्यासाला आजपर्यंत भारतरत्न मिळालेला नाही. मदर टेरेसासारख्या व्यक्तीला देशामध्ये भारतरत्न मिळतो. कारण त्या ख्रिश्चन आहेत. मग हिंदू संन्यासाला का मिळत नाहीत. देशामध्ये हिंदू असणे हा गुन्हा आहे का? या प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.