उत्कृष्ठ पंतप्रधान होण्याचे सर्व गुण राहुल गांधींकडे: तेजस्वी यादव

tejaswi-yadav
पटना – अवघे काही महिनेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिल्लक असून याच पार्श्वभूमिवर आघाडीचे, फाटाफुटीचे राजकारण सुरू झाले आहे. सध्यातरी नरेंद्र मोदी हेच एनडीएत पंतप्रधानपदाचा चेहरा आहेत. तर अजून तरी विरोधी पक्षाकडून कोणालाही पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यात आलेले नाही. पण, सर्वांत मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे मोठे कौतुक सुरू आहे. राहुल यांचे कौतुक करत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांच्याकडे उत्कृष्ठ पंतप्रधान होण्याचे सर्व गुण असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान होण्यासाठीचे सर्व गुण राहुल गांधी यांच्याकडे असून त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर महाआघाडीचे घटक पक्ष सामूहिकरित्या देशाचा पुढील पंतप्रधान ठरवतील, असेही स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे असे तेजस्वी यादव यांच्यापूर्वी द्रमुकचे नेते एम के स्टालिन यांनीही म्हटले होते.

तेजस्वी यादव एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, आपल्याविरोधात चालवण्यात आलेल्या दीर्घकालीन नकारात्मक अभियानानंतरही राहुल गांधींनी आपली दृढता, दयाळूपणाच्या या जोरावर लोकांची मने जिंकली. काँग्रेसला तीन प्रमुख राज्यात विजय मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष आणि ६९ टक्के मतदारांच्या मनात आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण करून दिली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान होण्याचे सर्व गुण त्यांच्याकडे आहेत. भारतातील सर्वांत जुन्या राष्ट्रीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि संसदेचे मागील १५ वर्षांपासून सदस्य आहेत. त्यांच्या पक्षाचे देशात ५ मुख्यमंत्री असून त्यांचे ते नेतृत्व करतात, हे विसरू नका. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करू नका.

Leave a Comment