भूपेन हजारिकांच्या ‘भारतरत्न’वर हरकत – मल्लिकार्जुन खर्गेंवर गुन्हा दाखल

Mallikarjun-Kharge
आसाममधील प्रसिद्ध गायक-संगीतकार भूपेन हजारिका यांना भारतरत्न देण्याबद्दल हरकत घेऊन अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गेंवर आसाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलीकडेच देहावसान झालेले लिंगायत महंत शिवकुमार स्वामी यांना भारतरत्न देण्याऐवजी एका गायकाला हा मान दिल्याबद्दल खर्गे यांनी आक्षेप घेतला होता. खर्गे यांनी शनिवारी केंद्र सरकारवर टीका करताना शिवकुमार स्वामी यांना भारतरत्न न देता एक गायक (भूपेन हजारिका) आणि रा. स्व. संघाची विचारसरणी पसरविणाऱ्या व्यक्तीला (नानाजी देशमुख) हा मान दिल्याबद्दल टीका केली होती.

माहिती अधिकार कार्यकर्ते राजू महंता यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. खर्गे यांनी आसामी लोकांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप महंता यांनी केला आहे.

“मोरीगांव पोलीस ठाण्यात मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे मोरीगांव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला रविवारी सांगितले.

महंता हे मध्य आसाममधील सामाजिक-सांस्कृतिक संघटना ‘सहाई’चे अध्यक्षही आहेत. खर्गे यांनी केलेली टिप्पणी ही आक्षेपार्ह असून त्यामुळे आसामच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लोकसभेत काँग्रेसचे नेते असलेल्या खर्गे यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Comment