अवघ्या 24 तासांत अयोध्येचा प्रश्न सोडवू : योगी आदित्यनाथ

yogi-aadityanath
लखनऊ – 29 जानेवारीपासून रामजन्मभूमी खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाचे पाचसदस्यीय घटनापीठ सुनावणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येसाठी पुढील आठवडा महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, न्यायालयाने परवानगी दिल्यास अयोध्या मुद्दा २४ तासांच्या आत निकाली काढू, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.

विश्व हिंदू पुरस्कृत धर्म संसदेची बैठक प्रयागराज येथील कुंभमेळ्यात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला राम मंदिर बांधण्याच्या मुद्द्यावर होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. धर्मसंसदेला भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले, दोन दिवसीय धर्म संसदेत राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे. संघ परिवारातील अनेक नेत्यांना धर्मसंसदेचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, त्यातील अनेकांनी अद्याप निमंत्रणाला दुजोरा दिलेला नाही. असे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अन्य नेते धर्मसंसदेला उपस्थित राहतील. ३० जानेवारीला अमित शहा लखनऊ येथे होणाऱ्या बूथ कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांची उपस्थिती निश्चित मानली जात आहे.

दरम्यान, न्यायालयाने परवानगी दिल्यास अयोध्या मुद्दा २४ तासांच्या आत सोडवू,असे सांगत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी वाद ओढवून घेतला. आदित्यनाथ एका खासगी वाहिनीशी बोलताना म्हणाले, राम मंदिर बांधकामाला होत असलेल्या विलंबाबाबत लोकांचा संयम सुटत चालला आहे.

Leave a Comment