आता बदलता येणार सेट टॉप बॉक्स कंपनी

set-top-box
मुंबई : लवकरच मोबाइल कंपनीप्रमाणे सेट टॉप बॉक्स कंपनीची सेवा (पोर्टेबिलीटी) बदलता येणे शक्य होणार असून याबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अध्यक्षांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. सध्या सेट टॉप बॉक्स कंपन्यांच्या सुरू असलेल्या बेलगाम कारभाराला हा निर्णय अंमलात आल्यास चाप बसेल, असे बोलले जाते.

सध्या सेट टॉप बॉक्समुळे केबल किंवा डीटीएच कंपनीची सेवा घेतलेल्या ग्राहकांना कंपनी बदलण्यात अडथळे येतात. या निर्णयामुळे ग्राहकांची होणारी कुचंबणा दूर होईल. या प्रस्तावाला डीटीएच कंपन्या व केबल सेवा पुरवठादारांकडून तीव्र विरोध होत असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे ट्रायला कठीण जाणार आहे.

प्रत्येक आॅपरेटरच्या सेट टॉप बॉक्सची तांत्रिक बांधणी वेगळी असल्याने कंपन्यांकडून त्यामध्ये दुसऱ्या कंपनीची सेवा देण्यामध्ये पायरसी व इतर तांत्रिक बाबींचा गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रत्येक कंपनीच्या सेट टॉप बॉक्समधील सॉफ्टवेअर वेगवेगळे असल्याने एका कंपनीच्या सेट टॉप बॉक्सवरून दुस-या कंपनीची सेवा पुरवणे अवघड होणार असल्यामुळे सेट टॉप बॉक्समध्ये सॉफ्टवेअर लागू करण्याऐवजी कोणत्याही कंपनीची सेवा घेता येईल, अशा प्रकारचे सेट टॉप बॉक्स बसवण्याच्या पर्यायावर काम करण्याची गरज शर्मा यांनी वर्तवली. सरकारच्या तांत्रिक सुविधा पुरवणा-या विभागांची मदत घेण्यात येत असून, यामध्ये मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. यासाठी लागणारा वेळ अपेक्षेपेक्षा जास्त लागत आहे. मात्र तरीही प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करण्यात यश मिळेल, असा दावा शर्मा यांनी केला.

Leave a Comment