भारतातील अतिगरीब झाले कमी – आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कौतुक

Poverty
भारताची वाढती आर्थिक क्षमता आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या योजनांचे विविध आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कौतुक सुरू आहे. आत्यंतिक गरिबी दूर करण्याच्या दिशेने भारत जगातील अन्य देशांपेक्षा खूप पुढे आहे, असा निर्वाळा आणखी एका संस्थेने दिला आहे.

देशातील अतिगरीब लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार, देशात 2011 साली दररोज 135 रुपयांपेक्षा कमी उत्पन्नात उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या 26.8 कोटी होती. आता ही संख्या 5 कोटींवर आली आहे, असे वर्ल्ड डाटा लॅब संस्थेने म्हटले आहे.

“भारत लवकरच अत्यंत कमी काळात गरीबी निर्मूलन करणारा सर्वात मोठा देश बनणार आहे. जगाने कदाचित भारताच्या या यशाकडे दुर्लक्ष केले आहे,” असे ब्रूकिंग या थिंक टँक संस्थेच्या अहवालात म्हटल्याचे टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने म्हटले आहे.

देशांतर्गत वापराची आकडेवारी जून महिन्यात येईल. त्यावेळी गरीबीचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे भारताचे मुख्य सांख्यिकी अधिकारी प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितले.

झपाट्याने होणारी आर्थिक वाढ आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणातील वापर यामुळे गरीबीचे प्रमाण कमी होत असल्याचे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. वर्ष 2004-05 पासून आतापर्यंत गरीबीमध्ये सातत्याने घट दिसून येत आहे.

Leave a Comment