बंगालमध्ये ममतांचे ‘एकला चलो रे’, 13 राज्यांत देणार उमेदवार!

mamata-banerjee
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष (टीएमसी) राज्यातील सर्व 42 लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे लढणार आहे. तसेच पक्ष 13 राज्यांमध्ये आपले उमेदवार उतरवणार आहे.

पक्षाचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी रविवारी भुवनेश्वर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. आमच्या पक्षाने पश्चिम बंगालमध्ये युती न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

“आम्ही निवडणुकांसाठी तयार आहोत. टीएमसी पुढील लोकसभा निवडणूक ओडिशासह 14 राज्यांमध्ये लढणार आहे. 19 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस होता कारण त्या दिवशी भाजपविरोधी पक्षांचे नेते कोलकात्यात एका व्यासपीठावर दिसले होते. आता भाजपचा सफाया होईल,” असेही ते म्हणाले. मात्र टीएमसी कोणत्या 13 राज्यांमध्ये उमेदवार देणार आहे, हे त्यांनी सांगितले नाही.

एक आठवड्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे सर्व विरोधी पक्षांची सभा घेतली होती. यात काँग्रेससह सुमारे दोन डझन भाजपविरोधी पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.
यापूर्वी टीएमसी आणि काँग्रेसमध्ये युतीबाबत बोलणी सुरू होती, मात्र गेल्या एक-दोन महिन्यांत बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे दोन्ही पक्षांनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment