मृत्यूला दोन वर्षे होऊनही जयललितांचे बँक खाते अद्याप सुरू!

Jayalalitha
तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूला दोन वर्षे उलटल्यानंतरही त्यांची बँक खाती अद्याप सुरू आहेत. त्यांनी न भरलेल्या प्राप्तिकराशी संबंधित मुद्दे प्राप्तिकर खात्याला अद्याप त्रास देत आहेत.

प्राप्तिकर खात्याने मद्रास उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. जयललिता यांच्या कोडनाडमधील निवासी व व्यावसायिक संपत्तींचे भाडे त्यांच्या बँक खात्यात अद्याप जमा करण्यात येत आहेत, असे खात्याने म्हटले आहे. जयललिता यांच्या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतरण करण्यास मनाई करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान प्राप्तिकर खात्याचे वरिष्ठ वकील पी. श्रीनिवास यांनी ही माहिती दिली.

जयललिता यांच्याकडून 16.74 कोटी रुपयांचा कर थकल्यामुळे त्यांचे पोएस गार्डन येथील वेद निलयम हे निवासस्थान खात्याने 2007 साली जप्त केले होते. आपल्या मृत्यूच्या सुमारे 10 वर्षांपूर्वीपासून जयललिता तेथेच राहत होत्या, असेही खात्याने म्हटले आहे. त्यांच्या चेन्नईतील दोन आणि हैद्राबादमधील एक संपत्तीही खात्याने जप्त केली होती.

“कोडनाड इस्टेटमधील त्यांच्या व्यावसायिक आणि निवासी मालमत्तांमधून दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात भाड्याची रक्कम जमा केली जात आहे, अशी आमच्याकडे माहिती आहे,” असे टाईम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

जयललितांच्या मृत्यूनंतर थकबाकी जमा करण्याची तसेच टॅक्स रिटर्न भरण्याची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे 5 डिसेंबर 2016 रोजी त्यांच्या मृत्यूनंतर थकबाकी व देणी वाढतच आहेत, असेही खात्याने म्हटले आहे.

Leave a Comment